नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना अज्ञात व्यक्तीने दोन निनावी पत्र पाठवून त्यांच्याकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास त्यांचे महिलासोबतची छायाचित्रे सगळीकडे व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. चौगुले यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
२५ फेब्रुवारी रोजी दुपारी चौगुले यांच्या ऐरोलीतील सुनील चौगुले स्पोर्टच्या आवारात हिरव्या रंगाचे बंद पाकीट ठेवल्याचे आढळून आले. या पाकिटामध्ये विजय चौगुले यांना उद्देशून टाइप केलेले दोन पत्र तसेच चौगुले यांचे तीन महिलांसोबतचे मॉर्फ केलेले कलर प्रिंट काढलेले फोटो आढळून आले आहेत. त्यातील एका पत्रामध्ये खंडणीखोराने ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. अन्यथा विजय चौगुले यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तर, दुसऱ्या पत्रामध्ये सुद्धा चौगुले यांच्या कुटुंबीयांच्या व मित्र-मैत्रिणींचे फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली आहे.