भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमय्या हे अभियंता अनंत कारमुसे याच्या घरी त्याला भेटण्यासाठी जात होते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कारमुसे यानं केला होता. त्यालाच भेटण्यासाठी जात असताना सोमय्या यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेतलं.
पोलिसांच्या या कारवाईवर सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. 'मुंबई पोलिसांनी माझ्या घरातूनच मला ताब्यात घेतलं आणि मला अनंत कारमुसे याच्या घरी जाण्यापासून रोखलं ही दुर्दैवी बाब आहे. कारमुसे याला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. आज सकाळी ११ वाजता मी कारमुसे याला भेटणार होतो,' असं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सोमय्या यांच्या आरोपांवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांना अटक केलेली नाही. ते आपल्या घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, असं पोलिसांनी सांगितलं. सोमय्या यांनी सांगितलेली कारणं ही अत्यावश्यक सेवेत येत नाहीत आणि ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडत नव्हते. त्यामुळं त्यांना वारंवार विनंती करूनही ते ऐकले नाहीत. त्यामुळं त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवले आणि नवघर मुकुंद पोलीस ठाण्यात नेण्यात आले, असेही पोलिसांनी सांगितले.
भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात