करोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्क न वापरल्यास संबंधित भा.दं.वि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. कारण, मुंबईत अनेक हॉटस्पॉट तयार झाले आहेत.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जातना मास्क वापरण्यात येणं गरजेचं असल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. साथीचा रोग कायदा १८९७ अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सिंगही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्याने चालताना, रुग्णालयात अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक करण्यात आलं आहे. याशिवाय वाहन चालवताना, सरकारी बैठकांमध्येही मास्क वापरणं अनिवार्य आहे.